बंगळुरू: कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरूतील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपट उंबरठा मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कार्नाड हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का-बालविधवा असलेल्या त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले.